Festivals 
चेंबरचा लाडू-चिवडा पोहोचला अमेरिकेत

  November 05,2023

   चवदार उपक्रमाचे थाटात उद्‌घाटन, यंदा नवा विक्रम होणार पुणे : दि पूना मर्चंट्‌स चेंबरचा अत्यंत लोकप्रिय ठरलेला चविष्ट दिवाळी उपक्रम लाडू-चिवडा वितरण आता सातासमुद्रापार पोहोचला आहे. अमेरिकास्थित भारतीय नागरिकांकडून या लाडू-चिवड्याची मागणी होत आहे. या चवदार उपक्रमाचे उद्‌घाटन शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात झाले. चेंबरचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष, तर या उपक्रमाचे ३६ वे वर्ष आहे. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पणन संचालक केदारी जाधव, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, आचल जैन, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. नाजूश्री सभागृह (जय जिनेंद्र प्रतिष्ठान) येथे हा कार्यक्रम पार पडला. लाडू-चिवडा या सामाजिक उपक्रमाचा यंदा नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने दि पूना मर्चंट्‌स चेंबरने जय्यत तयारी केली आहे. या समाजोपयोगी उपक्रमाची दखल लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड्‌स आणि गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌सने घेतली आहे. आ. माधुरीताई मिसाळ या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाल्या, चेंबर लाडू-चिवड्याचा दर्जाबाबत कधीच तडजोड करत नाही. गेली ३६ वर्षे ही सामाजिक सेवा सुरू आहे. मीसुद्धा हाच लाडू-चिवडा घरी नेते आणि लोकांनाही देते. हा उपक्रम अखंड सुरू राहावा. मी अनेक मर्चंट्‌स चेंबरना भेटी दिल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, मात्र असा चेंबर आणि असा कार्यक्रम मी कधीही पाहिला नाही. चेंबरच्या उपक्रमाची सविस्तर माहिती घेण्यासाठी मी एकदा चेंबरच्या कार्यालयात आवर्जून गप्पा मारायला येईल, अशा शब्दांत पोलिस सहआयुक्त कर्णिक यांनी शुभेच्छा दिल्या. चेंबरचे अध्यक्ष बाठिया प्रास्ताविकात म्हणाले, आमचा लाडू-चिवडा आता अमेरिकेत पोहोचला आहे. तेथील भारतीय व्यक्तींचे नातेवाईक येथे येऊन लाडू-चिवडा घेऊन जात आहेत. ही आमच्या उपक्रमाच्या दर्जावर उमटलेली विश्वासाची मोहोर आहे. गतवर्षी या उपक्रमांतर्गत सुमारे दोन लाख किलो लाडू-चिवड्याचे वितरण करून आमच्या चमूने विक्रम प्रस्थापित केला होता. यावेळी जुना विक्रम मोडून नवीन विक्रम निर्माण करण्याचा संकल्प आम्ही सोडला आहे. त्यासाठी चेंबरची सर्व टीम झाडून कामाला लागली आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वितरण केंद्राची संख्या वाढवून २२ केली आहे, असेही बाठिया प्रस्ताविकात म्हणाले. आम्ही हा उपक्रम गोरगरीब जनतेसाठी सुरू केला होता, मात्र स्वच्छता, गुणवत्ता आणि चवीमुळे आमचा लाडू-चिवडा समस्त पुणेकरांना आवडल्याने मागणी वाढली आहे, असेही बाठिया यांनी अभिमानाने नमूद केले आणि हा उपक्रम देशभर जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सीमेवरील जवानांना लाडू-चिवडा पाठवण्यासाठी आम्ही पुणेकर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच पुण्यात काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना सुमारे दोन हजार किलो लाडू-चिवडा पाहुण्यांच्या हस्ते सुपुर्द केला. सचिव रायकुमार नहार यांनी सर्वांचे स्वागत केले. दिनेश मेहता यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उत्तम बाठिया यांनी सूत्रसंचालन केले, तर ईश्वर नहार यांनी आभार मानले. यावेळी या उपक्रमासाठी अतिशय कष्ट घेउन रोज २५ हजार किलो लाडू-चिवडा करणारे पप्पू महाराज, उद्योजक सतीश सुराणा आणि सुमीत सुराणा, विष्णू दोषी, दीपकभाई जैन , जय जिनेंद्र प्रतिष्ठानचे अचल जैन आदींचा हृद्य सत्कार करण्यात आला. एक किलो आणि अर्धा किलो अशा पॅकिंगमध्ये लाडू-चिवडा उपलब्ध केला आहे. दोन्हींसाठी एक किलोचा दर प्रत्येकी १६० रुपये आणि अर्धा किलोचा दर प्रत्येकी ८५ रुपये ठेवण्यात आला आहे.